चोरीचा कॉपर विकत घेणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना जिल्ह्यातील सोलर प्लांटमधून कॉपर वायरची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेने चोरीचा कॉपर विकत घेणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ लाख २९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणामुळे सोलर प्लांटमधील चोरीच्या घटनांमध्ये चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सोलर प्लांटमधील कॉपर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी टाटा पॉवर प्लांटमधील तांब्याचे केबल, एमसी-४ कनेक्टर, वायर कनेक्टर आणि कॉन्ड्युट पाइप आदी साहित्याची चोरी झाली होती. या प्रकरणात तपासादरम्यान सुदाम बाळू काळे (वय ३५, रा. हातडी, ता. घनसावंगी) याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याने या चोरीच्या गुन्ह्यासह आणखी सात सोलर प्लांटमधील कॉपर चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्यानंतर चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. या तपासात गालिब अमर चाऊस (वय ४६, रा. घनसावंगी), जावेद जिलानी शेख (वय ३६, रा. खवणपाडा, ता. अंबड) आणि शकील बशीर शेख (वय ४२, रा. पावरतळम, जालना) यांच्याकडून चोरीचा माल खरेदी केल्याच्या अनुषंगाने मुद्देमाल जप्त करण्यात आला.
७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५३७ किलो तांब्याच्या धातूचे वायर केबल, एक होंडा कंपनीची शाइन मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी अंबड तालुक्यातील एका बंद घराचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम चोरी केल्याच्या प्रकरणातही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि ५ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सोलर प्लांटमधील चोरीच्या घटनांचा तपास आणि चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांविरुद्ध केलेली कारवाई यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न तीव्र केले आहेत.
No Comment! Be the first one.