४ डीसीपी, ७ एसीपींसह १,५०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचा सहभाग; ड्रोनद्वारेही नजर
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात ७ प्रमुख आणि १२३ लहान-मोठ्या रास-दांडिया स्थळांसह ४५७ सार्वजनिक देवी मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तसेच चार मिरवणुका, २१ ठिकाणी शस्त्रपूजन व पथसंचलन आणि पाच ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम होणार आहेत.
शहरात ४ डीसीपी, ७ एसीपी तैनात
शहर बंदोबस्तासाठी ४ पोलीस उपायुक्त (डीसीपी), ७ सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी), २८ पोलीस निरीक्षक आणि ५८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तैनात आहेत. याशिवाय १,२४९ पोलीस अंमलदार, १९२ महिला पोलीस आणि ५०० होमगार्ड बंदोबस्तात सहभागी असतील. विशेष शाखा व गुन्हे शाखेची पथकेही सतर्क ठेवण्यात आली आहेत.
कर्णपुरा यात्रेसाठी स्वतंत्र बंदोबस्त
कर्णपुरा यात्रेसाठी एक पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक पोलीस आयुक्त, सहा पोलीस निरीक्षक, २५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, २५० पोलीस अंमलदार आणि ७५ महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय तीन अधिकारी आणि ३० अंमलदारांचा अतिरिक्त बंदोबस्त असेल.
बॉम्बशोधक पथके आणि ड्रोनद्वारे नजर
सुरक्षेसाठी तीन बॉम्बशोधक व नाशक पथके (BDDS), सहा ठिकाणी नाकेबंदी, दंगा नियंत्रण पथक आणि ड्रोन पेट्रोलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

No Comment! Be the first one.