गोठा, मोटरसायकल, चारा व शेती साहित्य जळून खाक; शेतकरी कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाईची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथे मंगळवार दि१३ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.कुंजखेडा येथील प्रगतशील शेतकरी अशफाक कलंदर (साहेबवाडा) यांच्या गोठ्याला अचानक आग लागून होत्याचे नव्हते झाले आहे.या आगीत गोठ्यात बांधलेले शंकरपटासाठी धावणारे, परिसरात प्रसिद्ध असलेले तीन नामांकित, बक्षीस विजेते बैल*आगीत अत्यंत गंभीररित्या होरपळले असून जखमी झाले आहेत. हे बैल केवळ कुंजखेडा नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात शंकरपट आणि बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. या बैलांची बाजारातील किंमत अंदाजे ५० लाख रुपये इतकी सांगितली जात आहे. बैलांवर सध्या उपचार सुरू आहेत.
लाखोंचे साहित्य जळून खाक.
पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे गोठ्याचे संपूर्ण शेड, शेतात उभी असलेली युनिकॉर्न मोटरसायकल, शेती उपयोगी मौल्यवान साहित्य, चारा आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. एकूण नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाने तातडीने मदत द्यावी.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत आगीने सर्व काही गिळंकृत केले होते. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीने भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी चिकलठाण शिवसेना विभागप्रमुख कल्याण आबा चव्हाण आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.