‘गुड टच, बॅड टच’ची ओळख करून देत बालकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना निर्भयपणे व्यक्त होण्याचे आवाहन
लोकार्थ प्रतिनिधी वागलगावे माधव रावण चाकुर
रुई तांडा : बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रमशाळा, रुई तांडा येथे ‘सुरक्षित बचपन अभियानांतर्गत’ कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, मांडुरकी संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. मानसीदीदी हाके-पाटील होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. यू. व्ही. जाधव, ॲड. महाजन आणि ॲड. डी. एल. घोगरे उपस्थित होते.
यावेळी कायदेतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा २०१२, बालकांचे हक्क आणि वैयक्तिक सुरक्षिततेविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. ॲड. मानसीदीदी हाके-पाटील यांनी ‘गुड टच आणि बॅड टच’ यातील फरक समजावून सांगत कोणत्याही अनुचित प्रसंगात न घाबरता पालक किंवा शिक्षकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक जेलेवाड यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन स्वामी सर यांनी केले, तर आभार तेलंग सर यांनी मानले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

No Comment! Be the first one.