शाही स्नानासाठी नाथसागरमधून गोदावरीत पाणी सोडण्याचे नियोजन; साधू-संत, महंत आणि वारकऱ्यांसाठी सुविधांची तयारी सुरू – आ. विलास भुमरे
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबलवादे
पैठण – दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. पैठण येथील गोदावरी नदीच्या पवित्र घाटावर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते कुंभमेळ्याचा ध्वज फडकवून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या साधू-संत, महंत आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आमदार विलास भुमरे यांनी दिली. तसेच शाही स्नानाच्या वेळी गोदावरी नदीत पुरेसे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी नाथसागर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोदावरी नदीच्या पवित्र घाटावर आयोजित या सोहळ्यात आमदार विलास बापू भुमरे व वर्षाताई विलास भुमरे यांच्यासह नगराध्यक्षा विद्याताई भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले, रावसाहेब महाराज गोसावी, गंगाराम राऊत महाराज, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे आणि पंचायत समिती सदस्य सखुबाई झारगड यांच्या हस्ते ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात कलशपूजन करण्यात आले.
यानंतर गोदावरी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर आमदार विलास बापू भुमरे यांच्या शुभहस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित साधू-संत, महंत, लोकप्रतिनिधी आणि भाविकांनी सोहळ्यात सहभाग नोंदविला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भुमरे म्हणाले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पैठणमध्ये मोठ्या संख्येने साधू-संत, महंत आणि वारकरी दाखल होणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी नदीवरील शाही स्नान सुरळीत पार पडावे, यासाठी नाथसागर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला आयोजन समितीचे बळीराम महाराज जोगस, बबन महाराज चौरे, पवन लोहिया, नाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, भूषण कावसानकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे, दत्तात्रय रेवडकर, शहादेव लोहारे, दिनेश महाराज पारिख, नायब तहसीलदार वैशाली जांभळे आणि तलाठी शितल झिरपे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
संत परंपरा, गोदावरीचे पावित्र्य आणि पैठणचे धार्मिक वैभव यांची साक्ष देणाऱ्या या ध्वजारोहण सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक आणि प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता प्रत्यक्ष कुंभमेळ्यासाठी होणारी विकासकामे आणि भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.