एप्रिल महिन्यातच पोलीस प्रशासनाच्या बैठकीत केली होती मागणी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा अरविंदराव देशमुख यांचा आरोप
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
जालना शहरातील उड्डाणपुलावरून भरधाव ट्रक थेट खाली असलेल्या एकता धाब्यावर कोसळल्याची भीषण घटना नुकतीच घडली. या अपघातात काही जण जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अपघात झालेल्या घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते शेख हबीब मामू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तातडीने मजबूत संरक्षक कठडे बसविण्याची मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पोलीस प्रशासनाच्या बैठकीतच उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ आणि सामाजिक कार्यकर्ते शेख हबीब मामू यांनी ही मागणी प्रशासनासमोर मांडली होती.
मात्र, महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा आणि पोलीस प्रशासनाकडून या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप अरविंदराव देशमुख यांनी केला आहे. वेळीच संरक्षक कठडे बसविले असते, तर अशा प्रकारच्या गंभीर अपघाताचा धोका कमी करता आला असता, असेही त्यांनी नमूद केले.
उड्डाणपुलावरून अवजड वाहने वेगाने जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत सुरक्षा कठडे असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तरी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी केली आहे.
अपघात होण्यापूर्वीच दिलेल्या इशाऱ्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे.
No Comment! Be the first one.