65 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा; उर्वरित शेतकऱ्यांची यादी मंत्रालयात सादर – तहसीलदार ज्योती पवार
लोकार्थ मीडिया रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे
पैठण – राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी दुष्काळ अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र, दिवाळी सण उलटूनही पैठण तालुक्यातील हिरडपुरीसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या आश्वासनानंतरही आर्थिक मदत न मिळाल्याने दुष्काळाने आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने दिवाळीपूर्वी प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या काळात आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पैठण तालुक्यातील हिरडपुरीसह अनेक गावांतील शेतकऱ्यांना अद्याप या अनुदानाचा लाभ मिळालेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दिवाळी सण उलटूनही खात्यात अनुदान जमा न झाल्याने शासनाच्या घोषणेचे पुढे काय झाले, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. एकीकडे दुष्काळामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले असताना दुसरीकडे जाहीर केलेली मदतही वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, या संदर्भात पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आतापर्यंत तालुक्यातील सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भातील यादी मंत्रालयात सादर करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम नेमकी कधी जमा होणार, याकडे हिरडपुरीसह पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.