शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हट्टा येथील पाटबंधारे कार्यालयाला ठोकले टाळे.
लोकार्थ प्रतिनिधी अनिल पोरवाल जवळा बाजार
हिंगोली – पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या तपोवन मायनरमधील माटेगाव, परळी, ढऊळगाव, सावंगी, ब्राह्मणगाव आणि सोन्ना या सहा गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. वारंवार पाणीपुरवठ्याची मागणी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने सुप्रसिद्ध वक्ते तथा शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत पूर्णा पाटबंधारे विभागाच्या हट्टा येथील कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनाची दखल घेत संबंधित सहाही गावांना तातडीने कालव्याचे पाणी सोडण्यात आले. दरम्यान पाणी सोडण्याची कार्यवाही झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
तपोवन मायनरमधील माटेगाव, परळी, ढऊळगाव, सावंगी, ब्राह्मणगाव आणि सोन्ना या गावांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कालव्याचे पाणी संबंधित गावांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शेतीमध्ये वेळ आणि पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. पाण्याची उपलब्धता असूनही ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी शेतापर्यंत पोहोचत नसेल, तर सिंचन व्यवस्थेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी शेतकऱ्यांची भूमिका प्रशासनासमोर ठामपणे मांडत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनीही आपल्या मागणीला सक्रिय पाठिंबा दिला.
शेती हा ग्रामीण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीसाठी वेळेवर पाणी उपलब्ध होणे, ही शेतकऱ्यांची मूलभूत गरज आहे. कालव्याची व्यवस्था असतानाही केवळ नियोजनातील त्रुटी अथवा प्रशासकीय दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना कार्यालयीन प्रक्रियांच्या नावाखाली होणारा विलंब त्यांच्यासाठी आर्थिक संकट निर्माण करणारा ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला, तरी मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका संदीप माटेगावकर यांनी मांडली.
दरम्यान हट्टा येथील पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे संबंधित विभागाचे लक्ष सहाही गावांच्या पाणीप्रश्नाकडे वेधले गेले. अखेर आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून वरील सहाही गावांना तातडीने कालव्याचे पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणीवर कार्यवाही झाल्यानंतर शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी आंदोलन मागे घेतले.
हक्काचे पाणी मागतोय,
कुणाच्या दयेची भीक नाही.
तपोवन मायनरमधील सहा गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसताना संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या पिकांना पाण्याअभावी संकटात सोडणे कदापि मान्य होणार नाही. कारण शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळणे ही कोणाची मेहरबानी नसून त्यांचा हक्क आहे. त्यामुळे हक्काचे पाणी मागतोय,कुणाच्या दयेची भीक नाही! म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आम्हाला संघर्षाची हौस नाही, पण हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी नक्कीच आहे, अशा स्पष्ट शब्दांत शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी प्रशासनाला फटकारले.

No Comment! Be the first one.