शिवगड तांड्यात शेतकरी कुटुंबासोबत सण साजरा; वडगाव कोल्हाटी, प्रति पंढरपूर, सातारा परिसरातही मदतीचा हात
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पुढाकार घेतला. शिवगड तांडा येथे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मिठाई, फराळ, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांसोबत गावात दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.
याच उपक्रमांतर्गत पालकमंत्री शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिवगड तांडा येथे शेतकरी रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सुख-दुःख जाणून घेतले आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सामान्य नागरिकांना एकटे सोडणार नाही. त्यांच्या अडचणीच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी आहे, असा दिलासा शिरसाट यांनी यावेळी दिला. याशिवाय वडगाव कोल्हाटी, प्रति पंढरपूर आणि सातारा परिसरातही शिधावाटप करून दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

No Comment! Be the first one.