डाव्या कालव्यातून २५ दिवस पाण्याचे आवर्तन सुरू; छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्राला होणार लाभ
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबीलवादे
पैठण – दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी जायकवाडीच्या नाथसागर धरणातून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
पाणी वाटप समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र दापटकर व कार्यकारी अभियंता गणेश हसे यांच्या आदेशानुसार धरण अभियंता श्रद्धा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री डाव्या कालव्यातून सुरुवातीला ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. हे पाणी डाव्या कालव्याच्या २०८ किलोमीटरपर्यंत टप्प्याटप्प्याने पोहोचणार असून, हे आवर्तन २५ दिवस सुरू राहणार आहे.
या आवर्तनामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना नाथसागराच्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, नाथसागर धरणाची सद्यस्थितीतील पाणीपातळी ४६२.१३२ मीटर असून धरणात ७०.६२ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
उजव्या कालव्याच्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष!
दुसरीकडे गेवराई, बीड आणि माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही रब्बी हंगामासाठी पाण्याची प्रतीक्षा लागली आहे. उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग तातडीने सुरू करावा, यासाठी विविध लोकप्रतिनिधींकडून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या आमदार विलास भुमरे यांच्या सूचना!
रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्याची तयारी सुरू केली आहे. या काळात सिंचनासाठी विजेची आवश्यकता लक्षात घेता महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार विलास बापू भुमरे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
नाथसागरातून सुरू झालेल्या पाण्याच्या आवर्तनामुळे रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली असून, बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलू लागले आहे.

No Comment! Be the first one.