तुषार पाटील शिसोदे यांच्या पुढाकारातून शेतकरी स्नेहसंमेलन उत्साहात; आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पाडव्याच्या स्नेहसंमेलनातून ढाकेफळने जपली शेतकरी ऐक्याची परंपरा!
तुषार पाटील शिसोदे यांच्या पुढाकारातून शेतकरी स्नेहसंमेलन उत्साहात; आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पैठण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ढाकेफळ येथे पाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक शेतकरी स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे आणि संचालक अक्षय पाटील शिसोदे यांच्या पुढाकारातून अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही जपण्यात आली. या संमेलनाला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ढाकेफळ येथील कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे, माजी मंत्री कल्याणराव पाटील शिसोदे, काशिनाथदादा शिसोदे आणि संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कै. सुदामराव पाटील शिसोदे यांनी सणासुदीच्या काळात शेतकरी, नागरिक आणि मान्यवरांना एकत्र आणून सुसंवाद, आपुलकी आणि सामाजिक एकोपा वाढावा, या उदात्त हेतूने शेतकरी स्नेहसंमेलनाची परंपरा सुरू केली होती.
या स्नेहसंमेलनाला यापूर्वी जिल्ह्यातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभली होती. पैठणचे भूमिपुत्र तथा माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनीही या संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली होती. याच सामाजिक आणि सहकाराच्या व्यासपीठातून कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे यांनी पैठण तालुक्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यंदाच्या संमेलनात बदलत्या काळातील शेतीसमोरील आव्हाने, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि शेतीविषयक विविध समस्यांवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याविषयीही यावेळी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला रेणुकादेवी-शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदकुमार पठाडे, प्रल्हाद औटे, दीपक मोरे सर, राजेंद्र औटे, रमेशराव क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, पवन खरात, चितळे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शेतीतज्ज्ञ आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी स्नेह, सामाजिक एकोपा आणि शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण यांचा सुंदर संगम असलेली ढाकेफळची ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या स्नेहसंमेलनातून दिसून आला. पाडव्याच्या निमित्ताने एकत्र येत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
तुषार पाटील सिसोदे माजी चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना तथा जिल्हाध्यक्ष भाजप सहकार आघाडी.
No Comment! Be the first one.