ऑक्टोबर महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीत जमा करण्याची आयुक्तांकडे मागणी; सात नगरसेवकांचे पत्र
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. या दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे ऑक्टोबर २०२६ या महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. संबंधित मानधन आपल्या वैयक्तिक बँक खात्यात जमा न करता थेट मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीत वर्ग करावे, तसेच यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर गणेश कौतिकराव लोखंडे, सचिन खैरे, हनुमान शिंदे, अब्दुल रशीद माम, सावित्री वाणी, सुनीता सोनवणे आणि वैशाली कोरडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून हा निर्णय घेतल्याचे नगरसेवकांनी निवेदनात म्हटले आहे

No Comment! Be the first one.