पूर्णा तालुक्यातील गौर ग्रामस्थांचा संताप अनावर, चुडावा पोलिसांत तक्रार दाखल
पूर्णा तालुक्यातील गौर गावात घरगुती गॅस सिलिंडर वितरणातील कथित गैरप्रकाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. सिलिंडर सीलबंद असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल केली जात होती की काय, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सिलिंडरवर ३१.३ किलो वजन नमूद असताना प्रत्यक्ष वजन काट्यावर मात्र अवघे २७ किलो वजन आढळल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तब्बल चार किलो वजनाची तफावत समोर येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. गेल्या अनेक दिवसांपासून मनात असलेला संशय अखेर प्रत्यक्ष वजन काट्यावर उघड झाल्याने गौर गावात एकच खळबळ उडाली आहे.
गौर गावातील अनेक कुटुंबांना गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न सतावत होता. पूर्वी दीड महिना सहज पुरणारा गॅस सिलिंडर आता महिनाभरही का पुरत नाही? गॅसचा वापर पूर्वीसारखाच असताना सिलिंडर इतक्या लवकर रिकामा कसा होतो? महिलांमध्ये यावरून वारंवार चर्चा होत होती. सुरुवातीला महागाई, गॅसचा वाढलेला वापर किंवा कंपनीकडूनच कमी गॅस मिळत असावा, असे तर्क लावले जात होते. मात्र या संशयामागे काहीतरी वेगळेच गौडबंगाल असल्याची शंका ग्रामस्थांना येत होती.
अखेर आज सकाळी पूर्णा गॅस एजन्सीची वितरण गाडी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी थेट डिलिव्हरीच्या वेळीच सिलिंडरचे वजन करण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरी बॉयने नेहमीप्रमाणे सिलिंडर सीलबंद असल्याचे सांगत घाईघाईने वितरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्याला थांबवत सिलिंडर वजन काट्यावर ठेवण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर जे वास्तव समोर आले, त्याने सर्वांनाच धक्का बसला. सिलिंडरवर ३१.३ किलो वजन नमूद असताना वजन काट्यावर केवळ २७ किलो वजन दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तब्बल चार किलो वजनाची तफावत पाहून उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. सर्वसामान्य कुटुंबाच्या पैशाने खरेदी केलेल्या गॅसमध्ये एवढी तफावत असेल, तर ग्राहकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा सवाल उपस्थित झाला.
ग्रामस्थांनी डिलिव्हरी बॉयला याबाबत जाब विचारला असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. कधी एजन्सीला फोन, तर कधी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सीलबंद सिलिंडरमध्ये वजनाची एवढी तफावत कशी, हा साधा प्रश्नही अनुत्तरित राहिल्याने संशय अधिकच बळावला आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, हा प्रकार केवळ एका सिलिंडरपुरता मर्यादित नसून अनेक दिवसांपासून अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असण्याची शक्यता आहे. भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून तो इतरत्र विक्रीसाठी वापरला जातो का, हॉटेल, ढाबे आणि टपरीधारकांना अवैधरीत्या गॅस पुरवठा केला जातो का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या प्रकाराबाबत पूर्णा गॅस एजन्सीचे वितरक आहेर यांच्याकडे ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांनी चौकशी करून पाहतो, असे सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र ग्राहकांच्या हक्काच्या गॅसबाबत एवढी गंभीर तफावत समोर आल्यानंतर केवळ चौकशीचे आश्वासन देऊन चालणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या कथित गैरप्रकाराविरोधात गावकऱ्यांनी एकत्र येत चुडावा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित गॅस एजन्सी, वितरण कर्मचारी आणि या प्रकारामागील संपूर्ण साखळीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन प्रत्येक गावात ग्राहकांसमोर वजन काट्यावर सिलिंडरचे वजन करूनच वितरण करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गौरमध्ये समोर आलेला हा प्रकार केवळ एका गावाचा प्रश्न नसून तालुक्यातील इतर गावांमध्येही अशाच प्रकारे गॅस वितरण सुरू आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. ग्राहकांना पूर्ण वजनाचा सिलिंडर मिळतो की त्यांच्या नकळत त्यांच्या हक्काच्या गॅसवर डल्ला मारला जातो, याचा हिशेब आता प्रशासनानेच लावण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिक महागाईशी झुंज देत असताना त्यांच्या स्वयंपाकघरातील गॅसवरच डल्ला पडत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. गौर ग्रामस्थांनी दाखवलेली जागरूकता आता प्रशासनासाठी कसोटी ठरणार आहे. चार किलो गॅसची तफावत हा केवळ वजनाचा प्रश्न नाही, तर ग्राहकांच्या विश्वासाला बसलेला धक्का आहे. आता प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
No Comment! Be the first one.