पूर्णेत शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम; शिलाई मशीन व सायकलींचे वाटप, जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचा पुढाकार
लोकार्थ प्रतिनिधी सुशिल एस गायकवाड
पूर्णा : महिलांना केवळ मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम मिळावे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, तर ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी अंतराची अडचण येऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने शिलाई मशीन आणि सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. शुक्रवारी (दि. १३) गजानन मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाचा विधायक संदेश देण्यात आला.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शिलाई मशीनमुळे महिलांना घरबसल्या रोजगाराचे साधन उपलब्ध होणार असून, सायकलींच्या माध्यमातून विद्यार्थिनींचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव हजारे होते. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख व्यंकटराव पौळ पाटील, पंचायत समितीचे उपसभापती काशिनाथ काळबांडे, प्रकाशराव कन्हाळे, मुंजाभाऊ कदम, नगरसेवक सचिन कदम, रौफ कुरेशी, दादाराव पंडित, जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, संजय जल्हारे, मुंजाभाऊ कुकर, श्यामराव कदम, सुनील कदम, गजानन सवराते, अमृत कदम, उपशहरप्रमुख शंकर गलांडे, विकास वैजवाडे, बालाजी बैद्य, रमेश ठाकूर, सुदामराव ढोणे, गोविंद सोलव, गणेश कदम, सोमनाथ सोलव, अंकित कदम, राजू माने, गोविंद तेजबंद, विष्णू कदम, लक्ष्मण कदम, राम भालेराव, अनंता घाटोळ, विजय चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शिवसेनेच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारधारेनुसार शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि दुष्काळासह संकटाच्या काळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. महिलांच्या हाताला रोजगार आणि विद्यार्थिनींच्या शिक्षणाला साधन उपलब्ध करून देणारा हा उपक्रम पूर्णा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ कदम यांनी केले, तर दशरथ बोबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
No Comment! Be the first one.