लोकार्थ प्रतिनिधी पुनमचंद खोना सेलू,
मंदिरांचे गांव म्हणून लौकिकप्राप्त जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील गोकुळेश्वर पुष्करणी(बारव)च्या संवर्धनाच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे.राज्य पुरातत्व खात्याकडून जिल्ह्यातील एरंडेश्वर व भोगावं या ठिकाणच्या बारवांचे काम अंतिम टप्यात आहे.
मंडपयुक्त बारव...
सुमारे १२व्या शतकातील ही बारवा प्राचीन गोकुळेश्वर मंदिर परिसरात असून जिल्ह्यातील सर्वात मोठी भद्रा प्रकारातील बारव आहे . मंदिराच्या ईशान्य दिशेस असलेल्या व बारवेत चारही बाजूंनी अप्रतिम स्तंभरचना, तिन्ही प्रवेशद्वारालगत सहा, मंडपाच्या भिंतीवर २३ असे एकूण २९ मुर्ती विरहीत देवकोष्ट पहायला मिळतात. मंडपाने आच्छादित एवढे देवकोष्ट असणारी मराठवाड्यातील ही एकमेव बारव असावी.
पाण्यात बिल्वपत्र बुडते…?
बारावेच्या पश्चिम व पूर्व भागात दोन गर्भगृह आहेत
बारवेच्या पाण्यात श्रध्देने बेलाचे पान सोडल्यास ते मध्यभागी जावून बुडते अशी ग्रामस्थांची समजूत आहे. या प्राचिन वास्तूचा आकार ७३ फूट ८ इंच X १०५ फूट ८ इंच आहे. बारवेस चारही बाजूंनी मंडप आहे. मंडप दक्षिण उत्तर ६४ फूट २ इंच व पूर्व पश्चिम ६४ फूट २ इंच आणि ७ फूट ५ इंच रुंदीचा आहे.
बारवेच्या तीन बाजूस प्रवेशद्वार असून पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून बारवेच्या मंडपात उतरता येते.दक्षिण व उत्तरेकडील प्रवेशद्वारातून थेट बारवेच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बारवेची पूर्व बाजू बंदिस्त असून तेथून प्रवेशद्वार नाही. त्या ऐवजी तेथे गर्भगृह आहे. त्याच्या समोरासमोर पश्चिमेस आणखी एक गर्भगृह आहे. सद्यस्थितीत तेथे देवतामूर्ती अस्तित्वात नाहीत. मंडपापासून ते कुंडापर्यंत बारव जवळपास ४५ फूट खोल आहे.मंडपाला एकूण २४ पूर्णाकृती स्तंभ आहेत. बारवेत पूर्व आणि पश्चिम भागात असणाऱ्या गर्भगृह रचनेसमोरील स्तंभ उत्कृष्ट कोरीव काम केलेले असून त्यावर कीर्तीमुख कोरलेली आहेत.
बारवेतील देवकोष्ट
बारवेच्या तिन्ही प्रवेशद्वारालगत एकूण ६ देवकोष्ट आहेत. मंडपाच्या भिंतीवर २३ देवकोष्ट आहेत. या बारवेस एकूण २९ देवकोष्ट तेथे पूर्वी २९ देवतांच्या मूर्ती असाव्यात. कांही मूर्तीचे अवशेष परिसरात आढळतात.पुरातत्व खाते २०१५ पासून बारवेचे काम करीत आहे.या टप्प्यात उत्तर भागातील स्तंभ त्यावरील मंडपांचे काम होणार आहे. सद्यस्थितीला परभणी जिल्ह्यात पाणीसंकट घोंगावत असताना आजही या बारवेत पाणी आहे हे विशेष.

No Comment! Be the first one.