लोकार्थ प्रतिनिधी विक्रम खाडे सातारा
ओळख वाढवून व्हिडिओ कॉल आणि भेटीगाठींच्या माध्यमातून छुप्या कॅमेऱ्याने आक्षेपार्ह चित्रीकरण करायचे आणि त्याच चित्रीकरणाच्या आधारे लाखो रुपयांची खंडणी उकळायची, असा धक्कादायक ‘हनी ट्रॅप’चा प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांना आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तीन महिलांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी सापळा रचून दोघींना अटक केली असून, तिसरी महिला पसार झाली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत बाळासाहेब जाधव (वय ५७, रा. तासगाव, ता. सातारा) यांनी या प्रकरणी सविता शिंदे, गौरी पंडित आणि सोनाली शिंदे या तिघींविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जाधव यांची एका महिलेशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यात फोनवरून संवाद आणि व्हिडिओ कॉल सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठीही वाढल्या. या भेटीदरम्यान संबंधित महिलेने पर्समध्ये लपवलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
यानंतर गौरी पंडित हिने जाधव यांना वारंवार फोन करून एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगितले आणि ते व्हिडिओ जाधव यांना पाठवले. हे प्रकरण मिटवायचे असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या जाधव यांनी तातडीने सातारा तालुका पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित महिलांच्या फोन संभाषणाचे तांत्रिक विश्लेषण व रेकॉर्डिंग सुरू केले. तडजोडीअंती २० लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. यामध्ये १ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि त्यावर २० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवून एक पैशांची बॅग तयार करण्यात आली. सातारा महामार्गावरील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे सविता शिंदे आणि गौरी पंडित यांनी पैशांची बॅग स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही अटकेतील महिलांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर तिसरी संशयित सोनाली शिंदे ही पसार झाली असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
या प्रकरणातील सविता शिंदे आणि सोनाली शिंदे या महिला राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असून, त्यापैकी एका महिलेकडे राजकीय पद असल्याचेही वृत्त आहे. या घटनेमुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा तालुका पोलीस या हनी ट्रॅप प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

No Comment! Be the first one.