निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी गोपाळ सातपुते
हिंगोली | सेनगाव तालुक्यातील मौजे दाताडा, सुकळी बुद्रुक, सुकळी खुर्द व सापडगाव येथून सेनगावला जाणाऱ्या मुख्य जोडरस्त्याचे काम अवघ्या दीड ते दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच या रस्त्याची दुरवस्था झाली असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन हिंगोलीचे जिल्हा परिषदचे सीईओ यांच्याकडे गुरुवारी देण्यात आले
सापडगाव शिवरस्ता ते सेनगाव येथील हनुमान मंदिरापर्यंतचा हा जोडरस्ता चार ते पाच गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या गावांतील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हाच मुख्य रस्ता असून शाळा, महाविद्यालय, दवाखाना, बाजारपेठ, तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे जाण्यासाठी ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो मात्र, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच आजारी व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या
संबंधित रस्त्याची तात्काळ पाहणी करून पंचनामा करण्यात यावा व चार ते पाच गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी व सदर काम दोषदायित्व कालावधीत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून विनामूल्य दुरुस्ती करून घेण्यात यावी.
व रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये. दोषदायित्व कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बिल अदा केले असल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
ग्रामस्थांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती न केल्यास नाइलाजास्तव ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर विष्णू मुरकुटे
सतीश पाचपिल्ले वसंतराव अवचार प्रसाद पाचपिल्ले विजय धाकतोडे यांच्यासह संबंधित गावांतील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता जिल्हा परिषद बांधकाम विभाग या तक्रारीची कितपत दखल घेतो आणि संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करतो, याकडे चारही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.