लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी खुलताबाद
दौलताबाद येथील घाटातील कमानीमध्ये शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी एका ट्रकने कमानीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही बाजूने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या भाविक पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. खुलताबाद येथील श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. दोन अडीच तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शरणापुर दौलताबाद टी पॉइंट ते खुलताबाद हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद असताना या मार्गावरून जड वाहने कसे काय धावतात, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस या मार्गावरील जड वाहनांना प्रतिबंध का करीत नाहीत ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या वाहनधारकांना दौलताबाद घाट मार्ग प्रवास टाळून उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहनधारकांनी सहकार्य करावे तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची सद्यस्थिती जाणून पुढील प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दौलताबाद पोलिसांनी केले आहे. दौलताबाद घाटातील वाहतूक पूर्ववत होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळी उशिरा वाहतूक सुरळीत झाली.
पर्यायी रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार ?
दौलताबाद कमानीमध्ये वारंवार वाहतूक ठप्प होऊन वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. पर्यायी रस्त्याची काम केव्हा सुरू होणार व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाहतूक कोंडीचा त्रास केव्हा बंद होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


No Comment! Be the first one.