महाबीजकडून पुरवठा नसल्याने परळीतील तीन दुकानांवर ठणठणाट; अन्यथा रुमणे घेऊन आंदोलन करण्याचा ॲड. जीवन देशमुख यांचा इशारा
लोकार्थ प्रतिनिधी रवींद्र जोशी परळी वैजिनाथ
रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी ऑनलाइन नोंदणी करून शासनाकडून परमिट मिळाले; मात्र प्रत्यक्षात बियाणेच उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परळी शहरातील तीन दुकानांवर हरभरा बियाण्यांचा साठा नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. महाबीजकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
आधीच दुष्काळामुळे खरीप हंगामात आर्थिक नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. मात्र, पेरणीचा हंगाम सुरू असताना बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परमिट देऊनही बियाणे उपलब्ध होत नसेल, तर पेरणी कशी करायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
महाबीजने तातडीने हरभरा बियाण्यांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रुमणे हातात घेत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.

No Comment! Be the first one.