बिडकीन पोलिसांनी २४ तासांत खुनाचा छडा लावला; तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सख्ख्या मोठ्या भावाला अटक
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबेलवादे पैठण
दारूच्या नशेत नेहमी आई-वडील व मोठ्या भावाला शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाने लाकडी दांड्याने जबर मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारातील शेती वस्तीवर घडली. या खुनाच्या घटनेचा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोठ्या भावाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारातील गट क्रमांक ७३ मधील शेती वस्तीवर कान्हू एरंडे हे आपले दोन मुलगे नवनाथ कान्हू एरंडे आणि श्रीराम कान्हू एरंडे यांच्यासह वास्तव्यास होते. यातील लहान मुलगा श्रीराम याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन आई-वडील व मोठ्या भावाला शिवीगाळ करून घरात धिंगाणा घालत असे. त्याच्या या सततच्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते.
दरम्यान, दि. २४ रोजी श्रीराम एरंडे हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन शेती वस्तीवरील घरी आला. यावेळी त्याने आई-वडील व मोठ्या भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वारंवारच्या या त्रासाला कंटाळलेल्या मोठ्या भावाचा संताप अनावर झाला. त्याने घरात असलेल्या लाकडी दांड्याने श्रीराम याला जबर मारहाण केली. या मारहाणीत श्रीराम याच्या अंगावर गंभीर दुखापती होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या गंभीर घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एम. तडवी यांना मिळताच त्यांनी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हवालदार वाल्मीक निकम, संदीप धनेधर, अमोल मगरे, राजू चव्हाण व सतीश साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. मृत श्रीराम याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.
घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात जबर मारहाणीमुळे श्रीराम याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या तपासात पोलिसांचा संशय मयत श्रीराम याचा सख्खा मोठा भाऊ नवनाथ एरंडे याच्यावर गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, लहान भाऊ नेहमी दारू पिऊन आई-वडील व आपल्याला शिवीगाळ करून त्रास देत असल्याने कंटाळून त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशाप्रकारे बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपी नवनाथ एरंडे याला अटक केली आहे.


No Comment! Be the first one.