लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
कोलकाता येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत कार्यकारिणीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शांततापूर्ण पद्धतीने सुरू असलेल्या ग्राहक जागरणाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणून कार्यकर्त्यांना मारहाण करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
ग्राहक जागृतीसारखे लोकहिताचे कार्य शांततेच्या मार्गाने करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारांमुळे लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण सामाजिक कार्यासमोर प्रश्न निर्माण होतात. पश्चिम बंगालमध्ये ग्राहक जागरणाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याबद्दल संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
“ग्राहक जागरणाचे कार्य कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरूच राहील,” अशी भूमिका देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्यासह प्रांतातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ग्राहकांच्या हक्कांसाठी आणि शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेच्या भूमिकेतून करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देशभरातील कार्यकर्ते कोलकाता येथील सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. ग्राहक जागरणाच्या कार्यात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना लोकशाही व कायदेशीर मार्गाने विरोध केला जाईल. ग्राहकांचे हक्क, हित आणि जागृती यांसाठी संघटनेचे कार्य अधिक दृढतेने सुरू राहील, असे देवगिरी प्रांत कार्यकारिणीने स्पष्ट केले.
No Comment! Be the first one.