शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीवर शेकडो मेंढ्यांसह धडक; प्रशासनाची धावपळ, तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकर लातूर
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा-पाण्याअभावी पशुधनाचे हाल होत असून, मेंढपाळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मेंढपाळांनी शेकडो मेंढ्यांसह शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीवर ‘बोंबा मारो’ मोर्चा काढला.
दिवसभर शिवार पालथे घालूनही चारा-पाणी उपलब्ध होत नसल्याने वैतागलेल्या मेंढपाळ विश्वांभर श्रीहरी सोनटक्के व जिकू गोविंद गोबाडे यांनी मंगळवारी दुपारी आपला मोर्चा नगरपंचायतीकडे वळविला. प्रशासनाच्या नावाने बोंबा मारत आंदोलकांनी तब्बल सहा खंड्या मेंढ्या थेट नगरपंचायतीच्या दालनात आणल्या. यामुळे प्रवेशद्वारावरच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची नोंद ६७३ मि.मी. असून, यंदा आतापर्यंत केवळ ३०७ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाअभावी सिंचन प्रकल्प तळ गाठत असून, विहिरी व बोअरवेल आटल्याने मेंढपाळांना चारा-पाण्यासाठी शेतशिवारात दिवसभर भटकंती करावी लागत आहे.
शेळ्या-मेंढ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी संदेश सालके यांनी मेंढ्या-मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी नियोजन करण्यासह तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No Comment! Be the first one.