उत्तर प्रदेशातील दोन मजुरांवर संशय; प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोलटगाव येथील ठेकेदार इंद्रजीत बाबूराव खुळे (वय ५१) यांचा निर्घृण खून करून मृतदेह मॅनहोलमध्ये टाकून दिल्याची धक्कादायक घटना करमाड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोन मजुरांवर संशय असून, करमाड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
इंद्रजीत खुळे हे २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने तसेच त्यांचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद येत असल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांचा मुलगा विशाल खुळे यांनी करमाड पोलीस ठाण्यात वडिलांचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, मंगळवारी कुटुंबीय गोलटगाव परिसरासह करमाड भागात त्यांचा शोध घेत असताना एका किराणा दुकानदाराने २३ ऑक्टोबरला इंद्रजीत हे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील मजुरांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. ऋषभ श्रीवास्तव आणि रवीशंकर कुशवाहा या दोन मजुरांसोबत ते गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी सी-५ प्लॉट परिसरात शोध घेतला असता, सर्व्हिस रोडलगतच्या मॅनहोलमधून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले.
मॅनहोलमध्ये तपासणी केली असता प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळलेला इंद्रजीत खुळे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ आधारकार्ड, एटीएम कार्ड, लाल पाकीट आणि लोखंडी रॉडही मिळून आली. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.
इंद्रजीत खुळे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा तपास पोलीस करीत आहेत. संशयित दोन्ही मजुरांचा शोध सुरू असून, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे
No Comment! Be the first one.