लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार रेल्वे स्टेशन चौकातील टपऱ्या हटविण्यात आल्याने छोट्या व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहा-पंधरा रुपये कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या टपरीधारकांवर कारवाई झाली; मात्र मोठ्या व्यावसायिकांच्या रस्त्यावर आलेल्या बांधकामांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पाणीवेस, शनी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न
जालना शहरातील पाणीवेस, शनी मंदिर परिसरासह विविध भागांत रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर आलेली दुकाने, इमारतींचे बांधकाम आणि इतर अतिक्रमणांमुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे स्टेशन चौकातील गरीबांच्या टपऱ्या हटविण्यासाठी महानगरपालिकेने तत्परता दाखविली, मग शहरातील मोठ्या इमारती आणि दुकानांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत समानता हवी
शहरातील रस्ते मोकळे करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, अतिक्रमण हटविताना गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांवर समान कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रेल्वे स्टेशन चौकातील टपऱ्या हटविल्या, आता पाणीवेस, शनी मंदिर आणि इतर भागांतील मोठ्या इमारतींचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण कधी हटविणार? आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे जालना शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.