आईच्या कष्टाचे चीज करणारा सोमनाथ काळाच्या पडद्याआड; अमळनेर गावावर शोककळा, आदिवासी समाजातील पहिल्या सैन्यभरती जवानाचा दुर्दैवी अंत
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
सुट्टी संपवून कर्तव्यावर रुजू होण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकाकडे निघालेल्या सशस्त्र सेना दलातील जवानाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. येवला–वैजापूर रस्त्यावरील नांदगाव फाट्याजवळ पुलावर सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी ट्रकखाली गेल्याने जवान सोमनाथ गोरखनाथ जाधव (वय ३२, रा. अमळनेर, ता. गंगापूर) आणि त्यांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी निघालेले हिरामण गिरीजाराम माळी (वय ४३, रा. वडगाव, ता. गंगापूर) (मामाचा मुलगा)या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने अमळनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमनाथ जाधव हे १३ ऑक्टोबरपर्यंत सुट्टीवर होते. सुट्टीनंतर कर्तव्यावर परतण्यासाठी ते मनमाडकडे रवाना होत होते. हिरामण माळी हे त्यांना मनमाड रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जात असताना नांदगाव फाट्याजवळील पुलावर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकखाली गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. वैजापूर पोलिसांनी अपघातातील ट्रक ताब्यात घेतला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपलब्ध नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास बिट अंमलदार किसन गवळी करीत आहेत.
आईने मोलमजुरी करून शिकवले; मुलाने सैन्यात भरती होऊन मिळवला मान
सोमनाथ जाधव यांचा जीवनप्रवास संघर्षातून उभा राहिलेला होता. अमळनेर गावातील आदिवासी समाजातून सैन्यात भरती होणारा पहिला युवक म्हणून त्यांनी आठ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात प्रवेश केला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईने मोलमजुरी करून त्यांना शिकवले आणि सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ दिले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सैन्यात नोकरी मिळवली होती. ते उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणूनही परिचित होते.
सोमनाथ हे आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आशा त्यांच्यावर होती. त्यांच्या पश्चात आई आणि पत्नी असा परिवार आहे. कष्टाने मुलाला मोठे करून देशसेवेच्या मार्गावर पाठवणाऱ्या आईवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जवानाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने अमळनेर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. एका संघर्षशील युवकाचा प्रवास अचानक संपल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

No Comment! Be the first one.