लोकार्थ प्रतिनिधी
देशभरात आज निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांचा मुद्दा गाजवला जातोय. कॉंग्रेस अन् त्याचे साथीदार पक्ष त्यांचा राजीनामा मागण्यासाठी जीवाचं रान करीत आहेतच, पण आता फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा दावा करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीनंही हीच मागणी लावून धरली आहे. राजकीय आंदोलने सुरूच असतात, कारण विरोधी पक्षाला सत्तारूढ होण्याची घाई असते; मात्र, आता विद्यार्थी संघटनेनं आंदोलनात उडी घेतल्यामुळे या सर्वांचा डीएनए एकच असल्याची शंका लोकांना येऊ लागली आहे. सोशल मीडियाच्या युगात कोणती व्यक्ती काय अन् कशी आहे, हे एका क्लिकवर समजू लागल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांचाही तपशील अनेक पत्रकारांनी हुडकून काढला आहे. भारताला अशांत करण्याचा कट अमेरिकेत शिजला अन् दीपके हा कट शिजवताना तिथे हजर होते, असे काही व्हिडिओ सांगतात तर, ते तिथे शिकण्यासाठी गेलेच नव्हते, असं काहींचं म्हणणं आहे. त्यांची अमेरितल्या कोणत्याही विद्यापीठात अडमिशन नव्हती, असाही काहींचा दावा आहे. त्यामुळे लोक संभ्रमात पडले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणामंत्री पदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी दीपके यांनी पदरात पाडून घेतली अन् त्यानंतर शालेय शिक्षणावर त्यांनी लक्ष वळवले. अनेक शाळांना भेटी दिल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही देशभरातील शाळांच्या भेटी सुरू केल्या अन् शिक्षण व्यवस्थेतल्या दोषांवर बोट ठवलं. त्यांच्या या मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला, पण मध्येच त्यांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे देशाला अशांत करण्याच्या प्रयत्नांत तेही सहभागी झाले, असा संदेश गेला आहे. नेपाळ, बांगलादेशात जेन झीच्या आंदोलनांमुळे सत्तांतर झालं, तसंच भारतातही करण्याचा कॉक्रोच जनता पार्टीचा मनसुबा आहे काय, असा प्रश्न आता विचारला जातोय. काँग्रेस, शिवसेना अन् इतर विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध कंबर कसली आहे, पण महागाईवर रान उठवण्याचा सर्वांनाच विसर पडला आहे. या आंदोलनांविरुद्ध जे नेटकरी पेटून उठले, त्यांच्यावर सरकारची तळी उचलल्याचा आरोप केला जातो; मात्र, एखाद्या आंदोलनामुळे मूळ प्रश्न बाजूला पडत असतील तर दोन्ही बाजूंनी बोलणारे सक्रिय होतातच. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे शंभर हत्तींचं बळ आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला हे आंदोलनही यशस्वी होईल, असं वाटत असेल. मात्र, हे तेवढं सोपं नाही, हे एव्हाना या नवख्या पक्षाच्याही लक्षात आलंच असेल. डावे, अर्बन नक्षल, दिमागी नक्षल या सर्वांच्या साथीनं सरकारला घेरण्याचा मनसुबा रचलेल्या काँग्रेसमधूनच या आंदोलनांना विरोध केला जात आहे. महागाई, भ्रष्टचार, गरीबी हे सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे, तर निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार हे सत्तातूर लोकांचे प्रश्न आणि जनतेचा ज्या आंदोलनात सहभाग / पाठिंबा नाही ते यशस्वी होत नाही. एरवी शांत असलेले या देशाचे नागरिक निवडणुकीत मतयंत्राच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. त्यांनी आपल्या बाजूनं यावं, असं विरोधकांना वाटत असेल तर त्यांचेच प्रश्न हाती घ्यावे लागतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा.
No Comment! Be the first one.