१२ जण हद्दपार तर गावात थांबण्यास अनेकांना थेट मनाई आदेश!
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वाईजळे नांदेड
नांदेड- आगामी सण-उत्सवांच्या काळात नांदेड शहर व परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सामान्य नागरिक, व्यापारी व महिलांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कडक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यात ‘2+ स्कीम’ (दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत ८२८ गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नांदेड शहर व जिल्ह्यात मुख्य गणेश विसर्जन मिरवणुका सर्वत्र शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. उत्सवाचा पूर्वेतिहास व कायदा-सुव्यवस्थेची संवेदनशीलता लक्षात घेऊन, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आणि उपद्रवी घटकांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अन्वये धडक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशान्वये प्राप्त विशेषाधिकारांचा वापर करून ही विशेष मोहीम पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील, सुरज गुरव यांना विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी यांनी हाती घेतली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातून विविध पोलीस ठाण्यांमार्फत एकूण 828 गुन्हेगारांवर कलम 163 अन्वये प्रतिबंधक प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. नांदेड विभागातील 468 तर भोकर विभागातील 360 समाजकंटकांवर गावात थांबण्यास बंदी घालणारे अंतिम मनाई आदेश पारित करण्यात आले आहेत. यापूर्वी १६३ गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. गावात अवैध दारू विक्री, जुगार अथवा इतर अवैध धंदे चालवून किरकोळ कारणावरून वाद, मारहाण व दहशत निर्माण करणारे घटक तसेच मिरवणूक मार्गावर जाणूनबुजून घोषणाबाजी, धक्काबुक्की अथवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा पूर्वेतिहास असलेले इसम तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही वर्तनात सुधारणा न दाखवणाऱ्यांवर थेट गावात येण्यास अथवा थांबण्यास मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे.
१२ सराईत गुन्हेगार हद्दपार
श्री गणेश विसर्जनासह आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर व परिसरात शांतता, सुव्यवस्था कायम रहावी या अनुषंगाने नांदेड शहरातील तब्बल १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश नांदेड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील पाच, शिवाजीनगर आणि वजीराबाद ठाणे हद्दीतील प्रत्येकी तीन तर भाग्यनगर ठाणे हद्दीतील एका गुन्हेगाराचा यामध्ये समावेश आहे.
टोळ्या बनवून रात्री, अपरात्री धारदार शस्त्र व खंजीर बाळगून फिरणे, एकट्या नागरिकांना, रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दुकानदारांना अडून धमकावणे, खंडणी मागणे, मारहाण करणे अशा गुन्हेगारी कृत्यांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरात घुसून मारहाण, दंगल आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील दोन गुन्हेगार हे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातून तर दहा गुन्हेगार हे नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने आणि इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून सदर गुन्हेगारांना एका वर्षासाठी हद्दपार करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांच्यामार्फत नांदेड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे केली होती. प्राप्त अहवाल आणि पुराव्यांचे अवलोकन करून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सदरील १२ गुन्हेगारांना चार महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे अंतिम आदेश पारित केले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील अविनाश सोम भारती रा. विष्णुपुरी, सय्यद सलमान उर्फ भुऱ्या सय्यद बाबूमिया रा. फिरदोस नगर हडको, रणज्योतसिंघ उर्फ बच्चूसिंघ सतनामसिंघ बावरी रा. गोविंद कॉलनी, शुभम दत्ता सुनेवाड रा. विष्णुपुरी आणि आकाश रमेश चितळे रा. विजयनगर, सिडको या पाच जणांचा समावेश आहे. शिवाजीनगर ठाणे हद्दीतील यश उर्फ पिल्लू गौतम जोंधळे रा. क्रांतीनगर, सुबोध अनिल गजभारे रा. आंबेडकर नगर आणि प्रशिक मिलिंद केळकर रा. लेबर कॉलनी या तिघांचा समावेश आहे. वजीराबाद ठाणे हद्दीतील श्रीनिवास उर्फ आदू अनिल जाधव रा. दिलीपसिंग कॉलनी, प्रेमज्योतसिंग उर्फ सोनू तोपची रा. चिखलवाडी आणि सुरज उर्फ सुरज्या अरविंद हटकर रा. देगावजाळ या तिघांचा समावेश आहे. भाग्यनगर ठाणे हद्दीतील वैभव महेंद्र सूर्यतळे रा. साफल्यनग, यश नगरी या एका गुन्हेगाराचाही समावेश या हद्दपारीमध्ये आहे. वैभव सूर्यतळे आणि यश उर्फ पिल्लू गौतम जोंधळे या दोघांना नांदेड परभणी व हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.