लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहानूरमिया दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलसमोर दुचाकीवर थांबलेल्या तरुणाला मारहाण करून फायटरने छातीत वार करत मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. विशाल रोहिदास जाधव (२२, रा. रामनगर) आणि हितेश बालन्ना यादव (२१, रा. चौसरनगर, प्रतापनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नरेंद्र बनसोडे हे दुचाकीवरून जात असताना जैन इंटरनॅशनल स्कूलसमोर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना गांजा विकण्यावरून जाब विचारत शिवीगाळ व मारहाण केली. मोबाईल हिसकावल्यानंतर पासवर्ड देण्यास नकार दिल्याने एकाने फायटरने त्यांच्या छातीत वार केला. घाबरलेल्या बनसोडे यांनी पासवर्ड सांगितल्यानंतर आरोपींनी फोन-पेवरून १ हजार ७०० रुपये ट्रान्सफर केले आणि १० हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल घेऊन पळ काढला.
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२२/२०२६ दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल आणि आरोपीचा दुसरा मोबाईल असे एकूण २० हजार रुपये किमतीचे दोन विवो मोबाईल जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No Comment! Be the first one.