लोकार्थ प्रतिनिधी
आपल्या कार्यपद्धतीने आणि संवेदनशील प्रशासकीय कौशल्याने अल्पावधीतच जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणाची प्रचिती दिली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला अचानक भेट देऊन त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून दुपारचे जेवण (मध्यान्ह भोजन) घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
शाळेत अचानक पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाहून विद्यार्थी आणि शिक्षक अवाक झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्गात जाऊन शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पंगतीत बसून त्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा स्वतः अनुभवला. जेवताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, अभ्यास आणि स्वप्नांबद्दल आपुलकीने विचारपूस केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
बीडसारख्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक आणि संवेदनशील जिल्ह्यात काम करणे सोपे नसतानाही, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय शिस्तीसोबतच लोकसंवादावर भर दिला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला आपलेसे करून काम करण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळे, केवळ प्रशासनातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही त्यांच्या कार्यतत्परतेचे आणि साधेपणाचे कौतुक होत आहे.
शालेय पोषण आहाराची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दल आपुलकी आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण करणारी ही भेट सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


No Comment! Be the first one.