शेतकरी हिताला प्राधान्य देत नव्या ऊर्जेने हंगामाला प्रारंभ; राजेश टोपे यांच्या हस्ते उसाची मोळी
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे
घनसावंगी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक २ (सागर), तीर्थपुरी येथील २०२६-२७ या १६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी (ता. ६) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, कामगार तसेच कारखाना प्रशासनातील विविध घटकांच्या प्रतिनिधींच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाला सुरुवात झाली.
यावेळी ऊस उत्पादक सभासद रणजीत शंकरराव गुजर (आरगडे गव्हाण), भगवान रामनाथ देवकते (पिंपरखेड बुद्रुक), ऊस वाहतूक कंत्राटदार परमेश्वर गंगाधर जाधव (बोररांजणी), ऊसतोडणी कंत्राटदार भीमराव पांडुरंग जाधव (खडका), टायर गाडीवान अशोक विश्वनाथ मिंधर (बाचेगाव), उत्पादन विभागाचे सिनियर मॅन्युअल केमिस्ट विजय सोपानराव भांदरगे आणि इंजिनिअरिंग विभागाचे मिल फिटर किरण चंद्रभान कोकणे यांच्या हस्ते उसाची मोळी टाकण्यात आली.
कार्यक्रमास विविध संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय व कार्यकारी संचालक, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, मजूर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेश टोपे म्हणाले की, कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, मजूर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या सर्व घटकांच्या प्रतिनिधींच्या शुभहस्ते यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
शेतकरी आणि कारखाना यांचे नाते अधिक दृढ करण्यासोबतच ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देण्याचा कारखान्याचा सातत्याने प्रयत्न आहे. यंदा गाळपासाठी येणाऱ्या उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही टोपे यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला देताना विश्वासाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मागील वर्षी कारखान्याच्या दोन्ही युनिटमधून १५ लाख ५४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. यंदाही उपलब्ध उसाचे अधिकाधिक कार्यक्षमतेने गाळप करून कारखान्याची गाळप क्षमता आणि उत्पादनाची कामगिरी उंचावण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
कारखान्यास ‘उत्कृष्ट ऑनलाइन साखर विक्री’, ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ आणि ‘सर्वोत्तम ऊस विकास’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच युनिट क्रमांक २ (सागर), तीर्थपुरीला ‘सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ही कामगिरी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाच्या योजनेत सहभागी व्हावे. तसेच कारखान्यामार्फत निर्मित गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि पोटॅश खताचा ऊस पिकासाठी वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या सहकार परंपरेचा वारसा जपत नव्या ऊर्जेने आणि नव्या विश्वासाने यंदाच्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याची प्रगती, शेतकऱ्यांचे हित आणि गळीत हंगामाचे यश यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

No Comment! Be the first one.