बसस्थानक परिसरात भरदुपारी चोरी
लोकार्थ प्रतिनिधी लोकार्थ प्रतिनिधी परभणी,
बोरी येथील बसस्थानक परिसरात कार उभी करून हातगाडीवरून फळे घेण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी (दि. 7) भरदुपारी काही मिनिटांतच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कौसडी येथील दिलावर शरीफ बेग यांनी जिंतूर येथील एचडीएफसी बँकेतून 70 हजार रुपये रोख काढले होते. त्यानंतर ते कारने बोरीमार्गे कौसडीकडे जात होते. बोरी बसस्थानकाजवळ कार उभी करून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हातगाडीवरून फळे घेण्यासाठी ते गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून आतील 70 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांभ स्वामी व पोलिस कर्मचारी श्रीराम दंडवते यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
चोरट्याने कोणत्या पद्धतीने चोरी केली, तो कोणत्या दिशेने पसार झाला, तसेच चोरीपूर्वी त्याने परिसराची पाहणी केली होती का किंवा बेग यांचा पाठलाग केला होता का, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
No Comment! Be the first one.