लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : भूखंडाच्या जुन्या वादातून पडेगावातील रावरसपुरा परिसरात दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. ड्रेनेजलाइनच्या पाहणीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात ठाकरे गटाचे महापालिकेतील गटनेते तथा नगरसेवक गणेश लोखंडे आणि अर्जुन लोखंडे यांना छावणी पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेत दोन्ही गटांचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका बाजूने लोखंडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध, तर दुसऱ्या बाजूने नदीम आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भूखंडाच्या जुन्या वादातून हा संघर्ष झाल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
No Comment! Be the first one.