लोकार्थ प्रतिनिधी जयपाल ठाकूर
लातूर : लातूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चारा व पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लातूर जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला कडबा, सुका चारा, घास, उसाचे वाडे तसेच इतर प्रकारचा चारा जिल्ह्याबाहेर अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. भारत बास्टेवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार हा आदेश जारी केला आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, पुढील आदेश होईपर्यंत अमलात राहणार आहे.
स्थानिक शेतकरी व गोशाळांना प्रथम चारा उपलब्ध करणे बंधनकारक
लातूर जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक, व्यापारी आणि संबंधित संस्थांनी आपल्याकडील चारा प्रथम लातूर जिल्ह्यातील शेतकरी व गोशाळांना स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
परवानगीशिवाय चारा जिल्ह्याबाहेर पाठविणाऱ्या व्यक्ती तसेच संबंधित वाहनांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ५८ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये चारा व वाहन जप्त करण्यासह दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
जनावरांसाठी चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत स्थानिक गरजा प्रथम पूर्ण व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
No Comment! Be the first one.