APK फाईल उघडताच कंपनी मालकाचा मोबाईल हॅक; सायबर पोलिसांनी संपूर्ण रक्कम गोठवून परत मिळवून दिली
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ‘RTO चालान’च्या नावाने आलेली APK फाईल उघडल्याने कंपनी मालकाचा मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपचा ताबा घेतला. त्यानंतर कंपनीच्या अकाऊंटंटला संदेश पाठवून एक कोटी रुपये RTGSद्वारे परस्पर बँक खात्यात वळवून घेतले. मात्र, पुन्हा चार कोटी रुपयांची मागणी केल्याने अकाऊंटंटला संशय आला आणि त्याने तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रारदार तरुण नंदकिशोर सोहिंदा (४३, रा. पन्नालाल नगर, न्यू उस्मानपुरा) हे ‘एनव्हे बायोटेक प्रा. लि.’ या कंपनीचे मालक आहेत. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अज्ञात क्रमांकावरून RTO चालानच्या नावाने APK फाईल आली होती. ती उघडल्यानंतर आरोपींनी त्यांच्या व्हॉट्सअॅपचा वापर करून अकाऊंटंटला एक कोटी रुपये पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रक्कम इंडसइंड बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आली.
यानंतर चार कोटी रुपयांची पुन्हा मागणी झाल्याने अकाऊंटंटने थेट कंपनी मालकांशी संपर्क साधला. त्यावेळी मोबाईल हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपींचे खाते तसेच पुढे रक्कम वळविण्यात आलेली इतर खाती गोठवली.
पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एक कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम सुरक्षित करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अज्ञात आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, डीसीपी शशिकांत सातव व एसीपी मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोउपनि गणेश गिरी व सायबर पथकाने केली.
No Comment! Be the first one.