सनवच्या शिवना नदीपात्रातील थरार; आरोपींच्या अकेसाठी पाच पथके रवाना, गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री ११ नंतर दफनविधी
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोडे गंगापूर
गंगापूर : तालुक्यातील सनव येथील शिवना नदीपात्रात अवैध वाळू उपशाच्या वादातून रियाज साहेबखाँ पठाण यांच्यावर लोखंडी हातोडा, रॉड व लाकडी काठ्यांनी हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ७) पहाटे घडली. या प्रकरणी मयताचा मुलगा इरफान पठाण यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज पठाण यांचा शिवना नदीपात्रातून होणाऱ्या कथित अवैध वाळू उपशावरून काही व्यक्तींशी यापूर्वी वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास रियाज पठाण हे मुलगा इरफान याच्यासोबत नदीपात्राकडे गेले होते. त्यावेळी नदीपात्रातून आरडाओरड ऐकू आल्याने दोघे त्या दिशेने गेले असता असद सत्तार शेख याला काही जण मारहाण करत असल्याचे दिसले.
रियाज पठाण यांनी असद शेख याला मारहाणीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी रियाज पठाण व असद शेख यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर आणखी काही जण घटनास्थळी आले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, हातोडा व लाकडी काठ्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी मुजीब अब्दुल शेख याने रियाज पठाण यांच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर इतर आरोपींनी रॉड व काठ्यांनी त्यांच्या डोक्यावर, हातापायांवर, छातीवर, पाठीवर व मानेवर मारहाण केली. या मारहाणीत रियाज पठाण गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. असद सत्तार शेख यालाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर इरफान पठाण याने डायल ११२ वर संपर्क साधला. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने जखमी रियाज पठाण यांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
गुन्हा दाखल झाल्याशिवाय दफनविधी न करण्याचा पवित्रा
दरम्यान, रियाज पठाण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत दफनविधी न करण्याचा पवित्रा घेतला होता. पोलिसांनी कारवाई करत दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री अकरा वाजल्यानंतर सनव येथे रियाज पठाण यांचा दफनविधी करण्यात आला.
पाच पथके आरोपींच्या शोधात
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली असून, घटनेच्या पार्श्वभूमीवर सनव परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
No Comment! Be the first one.