भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे २९ सप्टेंबरपासून वाहतूक व्यवस्थेत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे ग्रामीण पोलिसांकडून आवाहन
लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी खुलताबाद
खुलताबाद : वेरूळ, ता. खुलताबाद येथील विकास आराखड्यांतर्गत श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील राज्य मार्ग क्र. २१६ (खुलताबाद जंक्शन ते वेरूळ) येथे भुयारी मार्गाच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी होणारे उत्खनन, संरचनात्मक कामे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर मार्गावरून जड-अवजड वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याने दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वाजेपासून दिनांक २९ मार्च २०२७ रोजी २४.०० वाजेपर्यंत या मार्गावरील जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कालावधीत वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी जड – अवजड वाहने ही पुढील प्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत.
कन्नड ते वेरूळ – खुलताबाद – दौलताबाद – छत्रपती संभाजीनगर या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने.
छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरसडी – कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडकडे जातील. तसेच खुलताबाद व श्री घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हलकी वाहने वेरूळ येथील महावीर चौकापर्यंत जाऊ शकतील व त्यानंतर खुलताबाद – दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाता येईल.
फुलंब्री–खुलताबाद–वेरूळ–कन्नड दिशेने जाणारी जड-अवजड वाहने.
फुलंब्री–छत्रपती संभाजीनगर–शरणापूर फाटा–माळीवाडा–वरझडी–कसाबखेडा फाटा–वेरूळ या पर्यायी मार्गाने कन्नड, चाळीसगावकडे वळविण्यात येतील.
तसेच कन्नड – चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक –
कन्नड – वेरूळ – कसाबखेडा फाटा – वरझडी – माळीवाडा – शरणापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे वळविण्यात येईल. वेरूळ येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची हलकी वाहने वेरूळ – कसाबखेडा फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाता येतील.
वाहतूक बदलाचा कालावधी :
२९ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वा. ते २९ मार्च २०२७ रोजी २४.०० वा.
दरम्यान, वाहनधारकांनी संबंधित कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.