कळमनुरीमध्ये फुटला राजकीय ‘फटाका’!
लोकार्थ प्रतिनिधी हिंगोली गोपाळ सातपुते
हिंगोली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (यूबीटी) पक्षाचे माजी आमदार संतोष टारफे यांनी बुधवारी (ता. चार) मुंबईत शिवसेनेत (शिंद गट) प्रवेश केला. टारफे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले युबिटी पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही पक्ष प्रवेश केला. या सामूहिक पक्षांतरामुळे ‘यूबीटी’ला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
कळमनुरी तालुक्यात शिवसेनेच्या राजकारणात माजी आमदार संतोष टारफे यांचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षाकडून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना ९१ हजार मते मिळाली होती. पण पराभव झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून संवादाचा अभाव असल्याचे कारण देत ते पक्षीय राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. पुढील राजकीय वाटाघाटी करून त्यांनी आता शिंदे गटाची वाट धरल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे टारफे यांनी एकट्याने पक्षांतर न करता जि.प.चे माजी अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हाप्रमुख गोपू पाटील, उपजिल्हाप्रमुख डी. के. दुर्गे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, बाजार समितीचे संचालक नागोराव करंडे, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, उपतालुकाप्रमुख अमोल काळे सोडेगावकर शिवाजी पोले जलालदाभेकर बहुरचे ग्राम पंचायत सदस्य विश्वनाथ गवारे माजी जिल्हा परिषद सदस्य एसपी राठोड गजानन ढाकरे माजी सभापती नागोराव करंडे प्रा एकनाथ कुटे सर माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील साळुंखे रमेश जाधव बापुराव घोंगडे गजानन अवचार सरपंच पाशा पटेल अरुण पिंपरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यामुळे हा केवळ काही नेत्यांचा पक्षप्रवेश नसून ‘यूबीटी’च्या संघटनात्मक ताकदीला बसलेला मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

No Comment! Be the first one.