जवाहरनगर पोलिसांची कारवाई; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तीन महिलांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी परिसरातील एक महिला गजानन महाराज मंदिराजवळ गणपती खरेदीसाठी आली होती. गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी तिच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. त्याचप्रमाणे अन्य एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्रही चोरी करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलांचा शोध घेतला. त्यानंतर पूजा राहुल पवार (२१), सुनीता दिलीप काले ३५) आणि मुस्कान राघव पवार (३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखालील मारोती गोरे रावते आणि पथकाने केली.




No Comment! Be the first one.