विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ : “तुरुंगाच्या भिंती व्यक्तीचे स्वातंत्र्य मर्यादित करू शकतात; मात्र त्याची आशा, मानवी प्रतिष्ठा आणि नव्या आयुष्याची संधी हिरावून घेऊ शकत नाहीत,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर सेंट्रल जेलमध्ये धर्मादाय विभाग, तुरुंग प्रशासन, धर्मादाय रुग्णालये, डॉक्टर व स्वयंसेवकांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तुरुंग रुग्णालयासाठी अत्याधुनिक डेंटल चेअर व वैद्यकीय उपकरणे सुपूर्द करण्यात आली. तसेच पुरुष कैद्यांना सीपीआरचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले.
न्यायमूर्ती सूर्यवंशी यांनी न्यायाची व्याख्या केवळ शिक्षेपुरती मर्यादित नसून, कैद्यांच्या मानवी प्रतिष्ठा, आरोग्य, सुधारणा आणि पुनर्वसनाचाही त्यात समावेश असल्याचे सांगितले. “एखादी चूक ही आयुष्यातील एक घटना असू शकते; ती व्यक्तीची संपूर्ण ओळख बनता कामा नये,” असे त्यांनी नमूद केले.
सहआयुक्त (धर्मादाय) नितीन जाधव यांनीही कारावासामुळे व्यक्तीचे मानवी अस्तित्व व प्रतिष्ठा संपत नसल्याचे सांगितले. तुरुंगातील आरोग्यसेवा ही मानवतावादी जबाबदारीसोबतच घटनात्मक मूल्यांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन डेंटल चेअरमुळे दंत उपचारांसाठी कैद्यांना बाहेरील रुग्णालयात नेण्याची गरज कमी होणार असून, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था, वाहन व मनुष्यबळावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला उपायुक्त उषा पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त प्रभू कापडे, तुरुंग अधीक्षक खामकर, मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वरुडीकर यांच्यासह डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, वकील, तुरुंग अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.



No Comment! Be the first one.