चंद्रकांत अंबिलवादे ता.प्रतिनिधी लोकार्थ
पैठण- दि २३ सप्टेंबर
पैठण तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज पैठण परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार विलास भुमरे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, पाण्याची उपलब्धता तसेच शेतीसमोरील विविध समस्यांची माहिती जाणून घेतली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी आमदार विलास भुमरे यांनी चर्चा केली. यावेळी खासदार संदिपान भुमरे यांनी शेतकऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशा सूचना तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, पंचायत समिती गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून पाठपुरावा करण्यात येईल,” असे आमदार विलास भुमरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पुढील काळातही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार भुमरे यांनी सांगितले.
No Comment! Be the first one.