विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी व्यापक बंदोबस्त तैनात केला आहे. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ४ डीसीपी, ७ एसीपी, ३८ पोलीस निरीक्षक, १४७ सपोनि/पोउपनि, २,४३४ पोलीस अंमलदार, एसआरपीएफ व आरएएफच्या प्रत्येकी एका कंपनीसह ५०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच १२ टास्क फोर्स आणि नियंत्रण कक्षात राखीव मनुष्यबळ ठेवण्यात आले आहे.
शहरातील ९४१ सार्वजनिक गणेश मंडळे आणि सुमारे १ लाख ६५ हजार घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी २२ अधिकृत विसर्जनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र बंदोबस्त, पाच स्ट्राइकिंग फोर्स, दामिनी व शोध पथकांची गस्त राहणार आहे.
ध्वनी प्रदूषणावरही पोलिसांची विशेष नजर असून २८ नॉइज लेव्हल मीटर उपलब्ध करण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्या मंडळांवर व डीजे चालकांवर कारवाई केली जाणार आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर ८ ड्रोन, सीसीटीव्ही आणि अँटी-ड्रोन यंत्रणेच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार असून तीन बीडीडीएस पथके कार्यरत राहतील.
शहराच्या प्रवेशमार्गांवर चेकनाके उभारून संशयास्पद वाहने तपासली जाणार आहेत. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या डीजे वाहनांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, जलतरणपटू, आरटीओ, महावितरण, एफडीए आणि शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता व संयम राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी केले आहे.
No Comment! Be the first one.