पावसाअभावी उभं पीक डोळ्यांदेखत जळालं!
लोकार्थ प्रतिनिधी – शरद मेहकरे लातूर
मराठवाड्यात यंदा दुष्काळाचं सावट अधिकच गडद होत चाललं असून, पाण्याच्या थेंबाथेंबासाठी शेतकरी आसूसला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे डोळ्यांदेखत जळून खाक होणारी पिकं आणि पाठीवर असलेलं कर्जाचं ओझं… या दुहेरी संकटाने मराठवाड्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेतला आहे.लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंळपाळ तालुक्यातून एक अतिशय वेदनादायी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे.
शिरूर आनंळपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथील अवघ्या ३३ वर्षांचे अल्पभूधारक तरुण शेतकरी अंकुश रमेश काळे यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.अंकुश काळे यांच्या नावावर अवघी दोन एकर शेती होती. दोन एकर शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा हाकणे अशक्य असल्याने, ते स्वतःच्या शेतीसोबतच गावातील इतर लोकांच्या शेतात सालगडी म्हणून मजुरीचे काम करायचे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४० हजार रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. एकीकडे बँकेच्या कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे पावसाअभावी शेतातील उभे पीक डोळ्यांदेखत करपून जात होते.
”पीक करपलं तर बँकेचं कर्ज कसं फेडायचं? आणि कुटुंबाचा उदरवाह कसा करायचा?” याच विवंचनेत आणि नापिकीच्या नैराश्यातून अंकुश काळे यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी स्वतःच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
No Comment! Be the first one.