डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन; पाणी सोडण्याची तारीख व आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे
घनसावंगी : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे आगामी हंगामात ऊसासह रब्बीतील गहू, हरभरा व इतर पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे किंवा नाही, पाणी सोडण्याची संभाव्य तारीख काय असेल आणि आवर्तनाचे नियोजन कसे राहणार, याबाबत जलसंपदा विभागाने अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी आरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) येथील शेतकरी रंजित शंकरराव गुजर यांनी केली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.
आगामी हंगामातील पीक नियोजनासाठी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेकडे लक्ष ठेवून आहेत. ऊस लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि इतर पिकांची पेरणी करण्याची तयारी सुरू असताना कालव्याचे पाणी नेमके कोणत्या पिकांसाठी आणि किती क्षेत्रासाठी उपलब्ध होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने लागवडीनंतर नियमित पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ऊस लागवडीपूर्वी केवळ सुरुवातीचे पाणी उपलब्ध होणार आहे की नाही, एवढीच माहिती न देता पुढील आवर्तनांचेही नियोजन स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गहू व हरभरा या रब्बी पिकांच्या पेरणीसह वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर पाण्याची गरज भासते. त्यामुळे कालव्याच्या पाणी नियोजनाची माहिती वेळेत मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.
पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्यास पाणी सोडण्याची संभाव्य तारीख, आवर्तनाचा कालावधी, उपलब्ध पाण्याचे प्रमाण, किती क्षेत्राला पाणी मिळणार आहे, ऊस लागवडीसाठी किती क्षेत्राचा विचार करण्यात आला आहे तसेच गहू, हरभरा व इतर रब्बी पिकांसाठी किती पाणी नियोजन करण्यात आले आहे, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने पाणी नियोजनाबाबत अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करून ही माहिती डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यानुसार ऊस लागवड करावी किंवा रब्बी पिकांची पेरणी करावी, याबाबत योग्य नियोजन करता येणार आहे.
पाण्याची उपलब्धता आणि आवर्तनांचे नियोजन स्पष्ट झाल्यास शेतकऱ्यांना बियाणे, खते, ऊस बेणे तसेच शेतीच्या मशागतीचे नियोजन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या आगामी हंगामातील पाणी नियोजन तातडीने स्पष्ट करून त्याची अधिकृत माहिती लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी रंजित शंकरराव गुजर यांनी केली आहे.

No Comment! Be the first one.