अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे आंदोलन
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
नांदेड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसह अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने आज (बुधवार) दि.३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राज्यात कमी पावसामुळे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्रात सरसकट कोरडा काळ जाहीर करणे, सिमेंट रस्ते, पर्वत व नदीपात्रातील वाळू उत्खनन तसेच वृक्षतोडी करणाऱ्यांवर कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालणे, दुष्काळग्रस्त भागातील जलसाठे व सिंचन विकासाला गती देणे आणि भूमिहीनांना जमीन उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. तसेच दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, पिकांच्या नुकसानीची भरपाई वाढवावी, उस, केळी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग-उडीद आदी पिकांना हेक्टरी वाढीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. वीटभट्टी कामगार व स्थलांतरित कामगारांना रोजगार आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी कॉ. अशोक घायाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष कॉ. मानेजी पाटील चोखाळेकर, पी.डी.वासमवार, दत्ता हरी जगदंबे, ज्ञानेश्वर नवले, चंदु झुंजारे, रावसाहेब बलके, विकास अंधुरे, सतीश जाधव, संदीप जाधव, रामेश्वर घायाळे, राजू राठोड यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. या आंदोलनाला भाकप व आयटकच्या वतीने कॉ. प्रदीप नागापूरकर, जनता दलाच्यावतीने डॉ. किरण चिद्रावार यांनी पाठिंबा दिला.
No Comment! Be the first one.