तांड्यांच्या विकासकामांचा आढावा; रस्ते, पाणी, स्मशानभूमी, महसुली दर्जा, स्वतंत्र ग्रामपंचायती व शैक्षणिक सुविधांवर चर्चा
लोकार्थ प्रतनिधी गुणीरत्न वाकोडे
जिंतूर::संत सेवालाल महाराज बंजारा-लबाना तांडा समृद्धी योजनेच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील तांड्यांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत तांड्यांशी संबंधित विविध विकासकामे तसेच प्रलंबित प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, पानंद व शिवार रस्त्यांची कामे, तांड्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्या तसेच स्मशानभूमीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्मशानभूमीसाठी फॉरेस्ट व ई-क्लास जमीन उपलब्ध करून देण्याच्या विषयावरही विचारविनिमय करण्यात आला.
तांड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तांड्यावर अभ्यासिका उपलब्ध करून देणे, MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची व्यवस्था, जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीची कामे तसेच तांडा प्रवेशद्वार उभारण्याबाबतही चर्चा झाली.
महसुली गावाचा दर्जा मिळविणे, स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती व ग्रामपंचायत विभाजनाच्या प्रस्तावांना गती देणे, तसेच पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे याबाबत आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा करण्याची भूमिका मांडण्यात आली.
तांडा समृद्धी योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य देत अशासकीय सदस्यांच्या सूचनांचा प्रभावीपणे विचार करण्यात यावा, तसेच तांड्यांच्या स्थानिक प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावावेत, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
यासोबतच तांड्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती, सामाजिक सहभाग आणि युवकांच्या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
बैठकीस योजनेचे समन्वयक डॉ. जगदीश सकवान, प्रशासकीय अधिकारी श्री. रविंद्र राठोड, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पानझाडे, श्री. निलेश जाधव (P.A., मंत्रालय, मुंबई), अक्षय राठोड तसेच परभणी जिल्ह्यातील माजी अशासकीय सदस्य विकास जाधव अंबरवाडीकर,सौ. संगीताताई जाधव,दशरथ राठोडॲड. साधनाताई राठोड,संतोष राठोड, लक्ष्मण चव्हाण, संदीप राठोड, माधव राठोड,सचिन आढे,व राजुदास पवार उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील तांड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ तांड्यांपर्यंत पोहोचविणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No Comment! Be the first one.