पावसाळा संपत आला, चिंचोलीचा तलाव अजूनही कोरडाच!
घनसावंगी प्रतिनिधी : अविनाश घोगरे
पावसाळा संपत आला… पण मच्छिंद्रनाथ चिंचोलीतील सिंचन तलावात पाण्याचा थेंब नाही! ज्या तलावाकडे शेतकऱ्यांनी आशेने पाहिले, त्याच तलावाचा आज तळ उघडा पडला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाने यंदा चांगले दिवस येतील, अशी आशा निर्माण केली होती; मात्र त्यानंतर पावसाने अशी पाठ फिरवली की तलावात पाणी साठण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी, तलाव कोरडा आणि शेतकरी हवालदिल, अशी विदारक परिस्थिती परिसरात निर्माण झाली आहे.
“सुरुवातीला पाऊस पडला तेंव्हा वाटलं, यंदा बरं होईल. पण त्याच्यानंतर पाऊसच आला नाही. आता तलावाचा तळ डोळ्यांसमोर दिसतोय. आभाळाकडं बघून बघून थकलो; पण पावसाचा पत्ता नाय. आता शेतीपेक्षा पाण्याचीच काळजी वाटतेय,” अशी एका शेतकऱ्याने व्यथा मांडली.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पावसाच्या लहरीवर अडकला आहे. बियाणे, खत, औषधे, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून पिके उभी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने या खर्चाचे काय होणार, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
“शेतीला पैसा घातला, रात्रंदिवस राबलो. पिकं उभी केली; पण पाणीचं नसलं तर सगळं कसं वाचणार? वर आभाळाकडं बघायचं, खाली तलावाकडं बघायचं… दोन्हीकडं कोरडंच दिसतंय.” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
तलाव कोरडा अन् विहिरींचीही धडधड वाढली!
सिंचन तलाव हा केवळ शेतीसाठी पाण्याचा स्रोत नाही, तर परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीला आधार देणारा महत्त्वाचा जलसाठा आहे. तलाव भरल्यानंतर भूजलपातळीला आधार मिळतो आणि विहिरींमध्ये पाणी टिकून राहते. मात्र यंदा तलावच कोरडा असल्याने आगामी काळात विहिरींची पाणीपातळी आणखी खालावण्याची भीती व्यक्त होत आहे.
“तलाव भरला की विहिरीला पाणी टिकतं. आता तलावातच पाणी नाय. उद्या विहीर कोरडी पडली तर शेती कशी करायची? जनावरांना पाणी कुठून द्यायचं? घरात प्यायला पाणी कुठून आणायचं?” असा सवाल शेतकरी करीत आहेत.
आशेच्या आभाळाकडे डोळे
एकीकडे पिके पाण्याअभावी संकटात, दुसरीकडे विहिरींची पाणीपातळी घटण्याची धास्ती आणि त्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पावसाची वाट पाहण्यात दिवस गेले; आता पावसाळाच संपत आला तरी तलावाच्या पात्रात पाण्याचा थेंब नाही.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर कोरडा तलाव आणि नजरा आभाळाकडे—हीच सध्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीची दुष्काळी कहाणी बनली आहे. प्रशासनाने केवळ परिस्थितीची पाहणी न करता जलसाठा वाढविण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व पशुपालकांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
तलाव कोरडा पडला आहे; पण त्याहून मोठे संकट म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातील आशा कोरडी पडू लागली आहे.
No Comment! Be the first one.