कन्नड प्रादेशिक वन विभागाची तत्पर कारवाई; वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव
कन्नड तालुक्यातील जेहूर-आडगाव शिवारातील गट क्रमांक ६१ मधील शेतकरी ज्ञानेश्वर निकम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याची कन्नड प्रादेशिक वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित सुटका केली. बिबट्याची पशुवैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता वन विभागाला घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पिंजऱ्याच्या साहाय्याने विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वनविभागाचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांच्या नेतृत्वात ही बचाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत वनपाल संजय कादी, वनसेवक अशोक आव्हाड, देविदास राठोड, शेख मकसूद सईद, वाहनचालक भाऊसाहेब वाघ, सुरेश राठोड तसेच संरक्षण मजूर रामेश्वर राठोड व लक्ष्मण सावंत यांनी सहभाग घेतला.
बचाव मोहिमेसाठी लक्ष्मण निकम, गणेश शिंदे, उपसरपंच राहुल सोनवणे, योगेश शिंदे, सोपान निकम, भावेश शिंदे, कल्याण गायकवाड, विशाल बहिरव, रवि सोनवणे, जनार्दन झिमन व किशोर बहिरव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.
दरम्यान, शेतातील विहिरींना संरक्षक कठडे बांधावेत. वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतः बचावकार्य करण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, सुरक्षित अंतर राखावे व बचाव पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी केले.


No Comment! Be the first one.