अपघातात आई वडील गमावलेल्या मुलीचाही मृत्यू
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
आजोळहून परतत असताना झालेल्या भीषण अपघातात आई वडिलांना गमावल्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या रीतीशा रोहित शेळके (वय 11) हिचा देखील सोमवारी दिनांक 12 रोजी दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी पार्क येथील व्यावसायिक रोहित दिलीपराव शेळके(38) व पत्नी माधवी रोहित शेळके हे आपली मुलगी रितीशा हिच्यासह ब्रह्मपुरी येथे तिच्या आजोळी शनिवारी गेले होते. रात्री परतत असताना उमरी फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका हायवा टिप्पर वर त्यांची कार मोठ्या वेगाने जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात रोहित व माधवी शेळके या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात रीतीशा जबर जखमी झाल्यानंतर त्याच अवस्थेत तिने तातडीने आपल्या मामास फोन करून मोठा अपघात झाला असून आई-बाबा हे जबर जखमी झाल्याचे सांगितले होते. स्वतः अत्यंत रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही या चिमुकलीने प्रसंगावधान राखत तातडीने केलेल्या मोबाईल फोन मुळे ब्रह्मपुरी व परभणी येथून तातडीने मदतीसाठी कुटुंबीय व मित्रपरिवार दाखल झाला होता. काही शिक्षक मंडळींनीही अशा जखमी स्थितीत असलेल्या रीतीशाला तातडीने परभणीतील रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले होते. यादरम्यान, रविवारी मोठ्या शोकाकुल अवस्थेत रोहित व माधवी या शेळके दांपत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरासाठी ही मोठी हळहळणारी बाब असताना रुग्णालयात रीतीशा मृत्यूची झुंज देत होती. डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करीत तिला वाचविण्याचे प्रयत्न करीत होते. सोमवारी दुपारनंतर तिची प्रकृती खालावत असल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी नेण्याचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने दुपारी चारच्या सुमारास ही चिमुकली मृत्यूची झुंज देण्यात यशस्वी ठरली. काळाने तिच्यावरही वेळ आणल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकाराने शहर भर मोठी हुळहुळ व्यक्त होत आहे.

No Comment! Be the first one.