राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण शहराच्या स्वच्छतेला आता मिळणार नवी गती! शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने पैठण नगरपरिषदेने नव्याने खरेदी केलेल्या बारा घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते या घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. संत एकनाथ महाराजांच्या पावन नगरीतील स्वच्छता व्यवस्थेला या नव्या वाहनांमुळे बळ मिळणार आहे.
पैठण शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने बारा नव्या घंटागाड्यांची खरेदी केली आहे. या घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या वाहनतळावर आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते पूजन करून घंटागाड्यांचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील प्रत्येक भागात नियमित कचरा संकलन व्हावे, नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, तसेच स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळावी, या उद्देशाने या घंटागाड्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाला पैठणच्या नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, माजी नगरसेवक भूषण कावसानकर, तहसीलदार ज्योती पवार, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्यासह नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व स्वच्छता विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत एकनाथ महाराजांची पावन भूमी असलेल्या पैठण नगरीला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि नगरपरिषदेचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत.
No Comment! Be the first one.