लोकार्थ प्रतिनिधी अक्षय थिगळे बुलढाणा
साखरखेर्डा / बुलढाणा : सुखाचा संसार, दोन लहान मुलं आणि बारा वर्षांची संसाराची साथ… मात्र सोशल मीडियावर झालेली ओळख प्रेमात बदलली अन् या प्रेमापोटी महिलेने संसाराचा गाडा सोडण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमाच्या धाग्याने अखेर एवढे टोक गाठले की, पती, दोन मुलं आणि नातेवाइकांना मागे सोडून दोन मुलांची आई प्रियकरासोबत जाण्यावर ठाम राहिली. २ नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह होऊन जवळपास १२ वर्षे झाली आहेत. या संसारातून तिला दोन मुलं असून मोठ्या मुलाचे वय दहा वर्षे, तर लहान मुलाचे वय चार ते पाच वर्षे आहे. दरम्यान, लांबच्या नात्यातील ३० वर्षीय युवकासोबत तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली. सोशल मीडियावरील संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. दोघांमधील जवळीक वाढत गेली आणि अखेर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली.
या प्रकाराची माहिती मिळताच महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेत तिला एका गावातून ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या युवकाला देखील पोलिसांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची माहिती मिळताच महिलेचा पती, काका, चुलत भाऊ यांच्यासह नातेवाइकांनी पोलीस ठाणे गाठले.
पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही बराच वेळ तिची समजूत काढली. मात्र, महिलेने आपला निर्णय बदलण्यास नकार दिला. ‘माझे खरे प्रेम याच्यासोबत आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला पतीसोबत राहायचे नाही,’ अशी भूमिका तिने घेतल्याची माहिती आहे. नातेवाइकांचे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले.
विशेष म्हणजे, दोन मुलांची आई असलेल्या या महिलेने चार ते पाच वर्षांच्या लहान मुलालाही सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलीस ठाण्यात उपस्थित नातेवाइकांसमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर संबंधित प्रकरण मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने साखरखेर्डा पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी महिलेला मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले.

No Comment! Be the first one.